My Life...

My Life...

Wednesday, March 4, 2015

माझ्या स्वप्नातले टिळक



कॉलेजातून घरी आलो आणि विसाव्यासाठी निवांत पडणार होतो. इतक्यात माझी नजर समोर असलेल्या "मराठी निबंधमाला" वर गेली. अभ्यासाला बसण्याआधी एखादा निबंध वाचण्याची मला इच्छा झाली.

मी पुस्तकाची पाने पालटली आणि एका पानावर येउन थांबलो. तो लोकमान्य टिळकांवर निबंध होता. मी वाचायला सुरुवात केली.

लोकमान्य टिळकांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक……

इतक्यात मागून कोणाचा तरी आवाज ऐकू आला.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!
होय, मी बाळ गंगाधर टिळक.
खरं तर मला इथे यायचंच नाहोतं. पण काय करू, राहवलं नाही नं !
अहो काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही भारत देशाची ?
भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्ष होऊन गेली. पण तुम्ही इंग्रजांच्या जाळ्यात अडकल्यासारखेच जगताय अजूनही !

स्वराज्यासाठी आम्ही अतोनात पैसे खर्च केले, घाम गळला, प्रसंगी रक्त देखील सांडवलं. आणि आज, आजकाल तर भ्रष्टाचार, घोटाळे, अत्याचार हे सर्व घडतंय. अरे म्हणावं तरी काय याला ?
आपण या मातीत जन्म घेतला, याच मातीनं आमचं संगोपन केलं आणि तुम्ही तिच्यातच भेगा निर्माण करायच्या ? ही कुठली पद्धत कृतज्ञता व्यक्त करायची ?

आणि किती विषण्ण कृत्य घडतायत इथे !
कुणी हिंदू म्हणून जगतोय तर कुणी मुसलमान म्हणून! धर्माचं ठीक आहे हो, पण गरजेवेळी "माणुस" म्हणून विशेषतः "भारतीय" म्हणून सामोरे या ना. आपापसातच कसले भांडताय ? समाजकंटक अगदी याचाच फायदा घेतात आणि तुम्ही मात्र मेंढरांसारखे पळता त्यांच्यामागे, नकळत का असेना !
तिरंग्याचे झेंडे रोवत गेलो आम्ही मरेपर्यंत आणि तुम्ही फक्त २ दिवस तिरंग्याला मानवंदना देऊन देशभक्ती दर्शवायची ?

खरी देशभक्तीपर सत्वपरीक्षा तेव्हा असेल जेव्हा तुम्हाला आपल्या देशासाठी प्राणत्याग करायची वेळ येईल.
आणि हो, आजच्या काळात तर प्राणत्याग करायची सुद्धा गरज भासत नही. काहीतरी सत्कार्य करा, आणि यमादूताची वात पहत बसा, असं होऊन राहिलंय !
मी गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोळकरांविषयीच बोलतोय. सामाजिक जाणीव करून देणाऱ्यांचे असे हाल होत आहेत, हे पाहून फारच वाईट वाटतं. पण मारेकरी अजूनही बाहेर फिरतात ही बाब व्यवस्थेसकट स्वराज्यावर देखील घृणास्पद काळिमा आहे !
याच साठी का स्वराज्य मिळवून दिलं होतं आम्ही तुम्हाला ? इतक्या वेळात तर ते इंग्रज आम्हा स्वातंत्र्यसैनिकांवर कोर्टात खटला चालवून फाशीवर चढवत असत.

स्वराज्याची झालेली ही दुरावास्था पाहून अगदी कीव येते हो. पण काय करणार, राजकारण तुमच्या हाती आणि राज्यकर्ते ही तुम्हीच, लोकशाही म्हणे!
मोफत मिळालेल्या एखाद्या वस्तूची किंमत जशी उपेक्षणीय ठरवली जाते, अगदी तशीच अवस्था करून ठेवलीय या स्वराज्याची !

एकच गोष्ट सांगतो, आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळा, नाहीतर एक दिवस असा येईल की भारतातून स्वराज्य नाहीसा होईल आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्यलढा लढवावा लागेल, ते सुद्धा एक हरवलेल्या स्वराज्यासाठी !
येतो मी. जय हिंद !

टिळक जात असताना मी ओरडू लागलो. त्यांना हाका मारून थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते निघून गेले आणि मला जाग आली. मला कळून चुकलं की मी इतका वेळ झोपेत होतो आणि स्वप्न पाहत होतो. हा कदाचित दृष्टांत होता.

निबंधात टिळकांच्या गीता रहस्यातला एक सुंदर श्लोक लिहिला होता.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोsस्त्वकर्मणि ।।
याचा अर्थ असा की, कर्म करणं हेच तुझं ध्येय आहे. त्याच्या फळाची अपेक्षा बाळगण्याचा तुला अधिकार नाही. कर्मातून काय मिळणार याचा विचार तू मनात आणू नकोस. तसंच कर्म न आचरण्याचं ही तू ठरवू नकोस.

इतक्यात मला आईची हाक ऐकू आली आणि मला प्रत्युत्तर द्यावे लागले. आई हाक मारून पाहत होती, मी जागा आहे की झोपलो आहे ते.

टिळकांच्या विचारसरणीला अभिवादन करून मी अभ्यासाला बसलो.

प्रेरणास्रोत: ओम राउत दिग्दर्शित लोकमान्य एक योग्पुरुष!