विसर्जन म्हणजे नक्की काय ?
Image Source: https://news.abplive.com/ |
विसर्जन या शब्दाचा उगम संस्कृत शब्द "विसृज्" इथून होतो. या शब्दाचे तसे अनेक अर्थ आहेत, पण सर्वसाधारण अर्थ आहे "सोडून जाणे".
गणेश विसर्जन या संदर्भातून जर विचार केला, तर ज्या बाप्पाची गणेश चतुर्थीला स्थापना केली जाते त्या बाप्पाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जित करणे म्हणजे त्याला "शारीरिक अवतारातून विसर्जित करून परत निसर्गाकडे पाठवणे" होय.
ते म्हणतात ना, कणाकणात देव असतो, म्हणजे माझ्या मते शक्ती असते. ती आहे नैसर्गिक शक्ती. निसर्गाकडे परत पाठवायला आधी बाप्पाला निसर्गातून साकार रूप द्यायला हवं. त्यासाठीच निसर्गात असलेल्या शाडू (clay) च्या मुर्त्या बनवल्या जातात, म्हणजे त्यांचे विसर्जन पुन्हा निसर्गात होईल. पण हल्लीच्या काळात POP (Plaster of Paris) च्या मुर्त्या बनवल्या जातात, ज्याचा उगम निसर्गातून प्रत्यक्षपणे होत नाही आणि त्याचे विसर्जनही निसर्गात होत नाही. उलट निसर्गाची हानी होते ती वेगळीच गोष्ट!
याविषयावर अनेक वाद-विवाद होतील. काहीजण म्हणतील मोठ्या मुर्त्या बनवणं शाडूने शक्य नाही किव्वा शाडू महाग आहे POP पेक्षा, पण मुळात मोठ्या मुर्त्या हव्यात कशाला? ज्या निसर्गातून आपण बाप्पाला साकार रूप देतो त्या निसर्गाला काही अंत नाही! त्यामुळे लहान-मोठा अशी तुलना मानवी गोष्टींची आहे, नैसर्गिक गोष्टींसाठी नाही. त्यामुळे जश्या जमतील तश्या आकाराच्या नैसर्गिक मुर्त्यांची स्थापना व्हायला हवी!
Image Source: https://www.bbc.co.uk/ |
आता कोरोना मुळे शासनातर्फे तयार केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन झालेल्या POP च्या मुर्त्यांची दुर्दशा बघून काही जणांना वाटेल कि आपल्या भावनांचा खेळ होतोय! पण मुळात आपल्याला गणेश विसर्जन कितपत माहिती आहे याची शहानिशा करावी! POP च्या मुर्त्यांच्या विसर्जनातून अजून काय अपेक्षा ठेवायची आपण? म्हणूनच शाडूच्या मुर्त्या वापरण्याचा उपक्रम सुरु करणे, ही खरी सद्भावना!
अशा या बुद्धिदेवताची कृपादृष्टी सर्वांवर राहो, हीच प्रार्थना! 😊
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏